जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) जिगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील दादुलगाव, तिवडी आणि गौलखेड परिसरातील शासकीय जमिनी ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर चढवून कोट्यवधी रुपयांची कथित ‘प्रॉपर्टी’ गोळा केल्याच्या गंभीर आरोपांच्या चर्चेत असलेले जळगाव जामोद पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी तथा विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
तक्रारदार ज्ञानेश्वर कवडे यांच्या तक्रारीवरून २५ हजार रुपयांच्या कथित लाचप्रकरणात अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर येताच जळगाव जामोद पंचायत समितीच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईनंतर आता जिगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शासकीय जमिनी, ग्रामपंचायत अभिलेख आणि त्यासंदर्भातील कथित व्यवहारांचीही सखोल चौकशी होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित जमीन व्यवहारांच्या चर्चेला या ACB कारवाईमुळे पुन्हा एकदा धार आली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ACB कारवाईची अधिकृत आणि सविस्तर माहिती तसेच तपासातील पुढील निष्कर्ष समोर आल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.










