जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील अकोला खुर्द शिवारात अज्ञात कारणाने लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याच्या टिनशेडसह सुमारे दीड लाख रुपयांचे कृषी साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवार, १४ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.
अकोला खुर्द येथील शेतकरी विनोद लक्ष्मण सातव (वय ५६) यांचे गट क्रमांक २५ मध्ये शेत आहे. सोमवार, १३ जुलै रोजी दिवसभर शेतातील काम आटोपून ते सायंकाळी घरी परतले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता शेतात पोहोचताच टिनशेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले.
या आगीत अडीच इंची स्प्रिंकलरचे ३० पाईप व ११ नोजल, दोन इंची स्प्रिंकलरचे ३० पाईप व १२ नोजल, एक हेक्टर क्षेत्रासाठीचे ठिबक संच, बियाणे, झटका मशीन, २५ किलो सोयाबीन बियाणे, कीटकनाशके आणि इतर साहित्य पूर्णपणे जळाले.
तलाठी राहाटे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ. विनोद मोरे तपास करीत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.















Total Users : 3299879