बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा-धाड मार्गावर संध्याकाळच्या वेळी घरी निघालेल्या एका ६५ वर्षीय शेतकऱ्याला मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी अडवलं… स्वतःची ओळख थेट ‘पोलीस’ म्हणून करून दिली आणि अफू, चरस, गांजाची तपासणी करण्याच्या नावाखाली झडती घेतली. मात्र काही मिनिटांतच शेतकऱ्याच्या हातातील हजारो रुपयांची सोन्याची अंगठी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार चिखला शिवारात समोर आला आहे.
चिखला येथील विलास रामसिंग वाघ (वय ६५) यांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. ११ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता वाघ हे शेतीचे काम आटोपून पायी घरी जात होते. बुलढाणा–धाड मार्गावरील दिगंबर पांडुरंग वाघ यांच्या शेताजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना थांबवले.
यातील एकाने आपण पोलीस असल्याचे सांगत, “अफू, चरस आणि गांजाबाबत तपासणी करायची आहे” असे सांगून त्यांच्या खिशांची झडती घेतली. त्यानंतर हातातील सोन्याच्या अंगठीचा नंबर तपासायचा असल्याचे सांगत अंगठी काढण्यास सांगितले. अंगठी सहज निघत नसल्याने संशयिताने स्वतःच ती काढून आता परत देतो असे सांगत बॅगेत ठेवली.
क्षणभरात मोबाइल परत देत दोघांनी दुचाकीवरून धूम ठोकली. वाघ यांनी आरडाओरड केली; मात्र तोपर्यंत कथित ‘पोलीस’ नजरेआड झाले होते.
या प्रकारात सुमारे ५ ग्रॅम वजनाची, ३२ हजार ३५७ रुपये किंमतीची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.










