जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) जानेफळ परिसरात निलगाईंचा हैदोस दिवसेंदिवस वाढत असून आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच वन्यप्राणी हिरावून घेत आहेत. मिस्किनवाडी (ता. मेहकर) येथील शेतकरी संदीप रामेश्वर आडवे आणि अरुण रामेश्वर आडवे या दोन भावांच्या तब्बल सहा एकर सोयाबीन पिकाची निलगाईच्या कळपाने अक्षरशः वाट लावली.
आडवे बंधूंचे जानेफळ शिवारातील गट क्रमांक २४३ मध्ये सहा एकर शेत आहे. मंगळवार, १४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता दोघेही डवरणीसाठी शेतात गेले. मात्र शेतात पोहोचताच समोरचे दृश्य पाहून त्यांना जबर धक्का बसला. कोवळे सोयाबीन पीक निलगाईंनी मोठ्या प्रमाणावर फस्त केले होते.
अतोनात नुकसान झाल्याने हताश झालेल्या शेतकरी बंधूंनी अखेर उरल्यासुरल्या पिकावर वखर फिरवून पुन्हा पेरणी केली. त्यामुळे ऐन हंगामात त्यांच्यावर दुबार पेरणीचा मोठा आर्थिक भार कोसळला आहे.
वनविभागाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून योग्य भरपाई द्यावी आणि निलगाईंचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी संतप्त मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.










