spot_img
spot_img

विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला वेग; पण ‘मॅपिंग’मध्येच अडकली नागरिकांची डोकेदुखी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम वेगाने सुरू आहे. जिल्हाभर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळत आहेत. गणना प्रपत्र भरून घेणे, पात्र मतदारांची माहिती नोंदविणे, मतदार यादी अचूक व अद्ययावत करणे, या उद्देशाने प्रशासन संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचा दावा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना मॅपिंग प्रक्रियेत गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि बीएलओ यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जात आहे. प्रशासन नागरिकांना अचूक माहिती देण्याचे आवाहन करत असताना, दुसरीकडे 2002 च्या मतदार यादीच्या आधारे होणाऱ्या मॅपिंगमध्ये मोठा गोंधळ निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2002 च्या यादीत आई आणि वडील दोघांची नावे असतील, तर केवळ चार अपत्यांचेच मॅपिंग होत आहे. पाचवे अपत्य मॅपिंग करताना ‘डिफॉल्टर’ दाखवले जात असल्याने संबंधित कुटुंबांची धावपळ सुरू झाली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, आई किंवा वडील यापैकी एकाच व्यक्तीचे नाव 2002 च्या यादीत असेल, तर फक्त दोन अपत्यांचे मॅपिंग होत असून तिसरे अपत्यही डिफॉल्टर दाखवले जात आहे.

मतदार यादी अचूक करण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रक्रियेत अशा तांत्रिक अडचणी राहिल्यास पात्र मतदारच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने केवळ आवाहनांवर न थांबता मॅपिंगमधील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. लोकशाही मजबूत करायची असेल, तर पात्र मतदाराला ‘डिफॉल्टर’ ठरविण्याऐवजी त्याचा अधिकार सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!