बुलढाणा (हॅलो बुलढाणा) “आमच्या परिसरातही माणसं राहतात! शहराचा कचरा आणून गावकऱ्यांच्या जगण्यावर घाला घालू नका,” अशा रोखठोक भूमिकेतून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी माळविहीर परिसरातील कचरा डेपोविरोधात प्रशासनाला धारेवर धरले. सावळा, सुंदरखेड आणि माळविहीरच्या ग्रामस्थांच्या संघर्षाला पूर्ण ताकदीने साथ देणार असल्याचे त्यांनी ‘हॅलो बुलढाणा’शी बोलताना स्पष्ट केले.
या प्रश्नाची पहिली ब्रेकिंग प्रसारित करून सुरुवातीपासून पाठपुरावा करणाऱ्या ‘हॅलो बुलढाणा’ने आजच्या मोर्चाचीही बातमी सर्वप्रथम मांडली. त्यानंतर तुपकरांनी दिलेल्या प्रतिक्रियेत गावकऱ्यांच्या आरोग्याचा, शेतीचा आणि जीवनमानाचा प्रश्न ठळकपणे उपस्थित केला.
डेपोजवळ वस्ती, पोदार शाळा आणि शेती असल्याचे सांगत, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा तुपकरांनी केला. जमिनींचे दर घसरत असून काही रहिवासी स्थलांतराचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. हा गावकऱ्यांच्या अस्मितेचा आणि जगण्याचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
ग्रामपंचायतीचा पाठिंबा आणि संबंधित शेतकऱ्यांच्या ना हरकत प्रमाणपत्रांशिवाय जागेबाबत निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली जागेची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचाही आरोप करत, प्रशासनाने ग्रामस्थांशी चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. वन्यजीवांना त्रास होण्याबाबत वन विभागाच्या अहवालाचा संदर्भही त्यांनी दिला.
“पोलिसांचा धाक दाखवून सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तर तो कदापि खपवून घेणार नाही,” असा इशारा तुपकरांनी दिला. वस्ती आणि शेतीला त्रास होणार नाही, अशा पर्यायी ठिकाणी प्रकल्प उभारावा, अशी त्यांची मागणी आहे.हिंगोली-नांदेड दौऱ्यामुळे आजच्या मोर्चाला उपस्थित राहता आले नसल्याचे सांगत, यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देताना ग्रामस्थांसोबत गेल्याची आठवण त्यांनी करून दिली. संघर्ष समितीच्या पाठीशी गावकरी म्हणून खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नात राजकारण आणू नका; जनभावना समजून घ्या आणि डेपो हटवण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्या,” अशी तुपकरांची ठाम मागणी आहे











Total Users : 3536199