spot_img
spot_img

EXCLUSIVE! गाड्या अडवल्या… आता गावं पेटली संतापाने! ‘शहराचा कचरा आमच्या माथी का?’ माळविहीर-सावळा-सुंदरखेडच्या ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; शेती, शाळा अन् पाण्याचा सवाल – कचरा डेपो हटणार की संघर्ष वाढणार?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहराचा कचरा आमच्या गावाजवळ कशासाठी? मुलांचे आरोग्य, शेतकऱ्यांची शेती आणि पिण्याच्या पाण्याचे काय? असे संतप्त सवाल उपस्थित करत माळविहीर, सावळा, सुंदरखेड, भादोला आणि सुंदरखेड विस्तारित परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. माळविहीर येथील ‘ई-क्लास’ जमिनीवरील प्रस्तावित कचरा डेपो कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

हा राजकीय मोर्चा नाही; आमच्या जगण्याचा प्रश्न आहे! अशी भूमिका मोर्चेकर्‍यांनी मांडली. बुलढाणा नगर परिषदेचा कचरा डेपो या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या हालचालींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.

गाड्या आल्या… ग्रामस्थ आडवे उभे राहिले!

मध्यंतरी प्रस्तावित जागेवर कचरा आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र ग्रामस्थांनी गाड्या अडवल्यानंतर त्या परत गेल्याचा दावा प्रतिनिधींनी केला. त्यावेळी नागरिकांच्या अंगावर गाड्या घालण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला. या आरोपाबाबत संबंधित यंत्रणेची बाजू उपलब्ध झालेली नाही.प्रस्तावित जागेजवळ अनेकांच्या शेती,वस्ती, लहान मुलांचे पोदार इंटरनॅशनल स्कूल, ज्ञानगंगा अभयारण्य आणि देवस्थाने असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.कचऱ्यामुळे दुर्गंधी,डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.पलढग जलाशयातील पिण्याचे पाणी आणि वन्यजीवांवर संभाव्य परिणाम होण्याची चिंताही निवेदनात मांडण्यात आली आहे.

“शाळेजवळ कचरा, शेताशेजारी दुर्गंधी अन् वस्तीजवळ रोगराईची भीती हे आम्ही का सहन करायचे?” असा आंदोलनकर्त्यांचा सवाल आहे. परिसरातील जमिनींचे मूल्य आणि भविष्यातील वस्तीविस्तारावरही परिणाम होऊ शकतो, असे ग्रामस्थांणी सांगितले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हणवतखेड येथे सुमारे ४० वर्षांपासून डेपो सुरू आहे. तो तेथेच ठेवावा, अशी त्यांची मागणी आहे. प्रकल्प पुढे रेटल्यास उपोषण व सामूहिक आत्मदहनाचा गंभीर इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर स्थलांतराची गरज,जागेच्या निवडीचे निकष आणि ग्रामस्थांनी मांडलेल्या पर्यावरणीय चिंतांबाबत प्रशासनाच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. ग्रामस्थांच्या आक्षेपांवर सुनावणी होणार का, त्यांच्या मागणीचा विचार होणार का आणि या ज्वलंत प्रस्तावाबाबत पुढील निर्णय काय असेल,याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे

 

 

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!