spot_img
spot_img

फक्त आश्वासन नाही… थेट हातात मंजुरी आदेश! लोणार तहसीलमध्ये योजनांचा लाभ अन् आरोग्यसेवेची साथ; “शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवणार!”- उपविभागीय अधिकारी प्रशांत सानप

लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी प्रशांत सानप यांनी केले. लोणार तहसील कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी ‘सेवा संकल्प’ आणि ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत विविध शासकीय सेवांचे वाटप व मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला तहसीलदार भूषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोटखराब क्षेत्राचे लागवडीखालील क्षेत्रात रूपांतर करण्यासंबंधी सेवा, कालमर्यादेत निकाली काढलेल्या महसुली प्रकरणांचे अंतिम आदेश आणि संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी आदेश लाभार्थ्यांना देण्यात आले. शासकीय नकलांसह आयुष्मान भारत कार्ड आणि ऑनलाइन शिधापत्रिकांचेही प्रत्यक्ष वाटप झाले.

गरजूंच्या हातात मंजुरी आदेश, शेतकऱ्यांना महसुली सेवांचा लाभ आणि नागरिकांच्या आरोग्याची तपासणी अशा विविध सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाला. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने आयोजित शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तालुक्यातील शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला.

नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर यांनी प्रस्तावनेत अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. रामप्रसाद डोळे, मयूर इप्पर, आरती दांडगे, डॉ. वैभव मापारी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा आणि वंचितांना सुलभ सेवा देण्यावर अभियानाचा भर होता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!