मेहकर (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) कुशीत गाढ झोपलेला पाच वर्षांचा निष्पाप चिमुरडा… मध्यरात्री काळ बनून आलेला साप… गावात वीज नसल्याने गडद अंधार… आणि सर्पदंश ओळखण्यात झालेली चूक! मेहकर तालुक्यातील राजगड येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. राज अभिषेक राठोड वय ५ वर्ष असे मृत चिमुरड्याचे नाव आहे.
राज नेहमीप्रमाणे रात्री आपल्या आईच्या कुशीत झोपला होता. मध्यरात्री सुमारे २.१५ वाजता एका विषारी सापाने त्याच्या पायाला दंश केला. तीव्र वेदनेने राज रडत उठला आणि आईला जागे केले. मात्र त्या वेळी गावातील वीजपुरवठा खंडित होता. सर्वत्र काळाकुट्ट अंधार असल्याने टॉर्च आणि मोबाईलच्या प्रकाशात शोध घेऊनही नेमके काय झाले, हे समजू शकले नाही. अंधारात मुलाला कदाचित उंदराने चावा घेतला असावा, असा अंदाज कुटुंबीयांनी बांधला.
दरम्यान, राजला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मागे नातेवाईकांनी घरात पुन्हा शोध घेतला असता, राज झोपलेल्या गोधडीखालीच विषारी साप लपलेला आढळून आला. तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.
रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून हा उंदराचा नव्हे, तर सर्पदंश असल्याचे स्पष्ट केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विष शरीरात पसरल्याने डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे पडले आणि राजला मृत घोषित करण्यात आले.आईच्या कुशीत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या लेकराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










