spot_img
spot_img

BIG BREAKING! मतांचा थरार, सरनाईकांची बाजी अन् काँग्रेसला धक्का! दुसऱ्या पसंतीत विजयावर शिक्कामोर्तब; अदिती पोहरे पराभूत, बंडखोरीचे आव्हान मोडून अमरावतीच्या शिक्षक मतदारसंघावर पुन्हा सरनाईकांचा झेंडा!

अमरावती (हॅलो बुलढाणा वृत्तसेवा) पहिल्या पसंतीत आघाडी, पुढील पसंतीच्या मतमोजणीत विजयाचा फैसला! अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांनी पुन्हा विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना पराभव स्वीकारावा लागल्याचे वृत्त समोर आले आहे. या निकालाने शिक्षक मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत महायुतीने बाजी मारली आहे

मतमोजणीच्या सुरुवातीपासून सरनाईक यांनी आघाडी घेतली होती. मात्र, पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला १६ हजार १३४ मतांचा कोटा गाठता आला नाही. त्यामुळे पुढील पसंतीच्या मतांकडे सर्वांचे लक्ष लागले. कमी मते मिळालेल्या उमेदवारांना बाद करून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीनुसार मते वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

पहिल्या पसंतीच्या मोजणीत सरनाईक यांना ८ हजार १६२ मते मिळाली होती. अदिती पोहरे यांनी ४ हजार ६८८ मते मिळवली, तर शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांच्या खात्यात ४ हजार ६६८ मते जमा झाली. पोहरे आणि देशपांडे यांच्यात अवघ्या २० मतांचे अंतर असल्याने दुसऱ्या स्थानासाठीही काट्याची टक्कर पाहायला मिळाली

बंडखोरीचे आव्हान; सरनाईकांची सरशी!

या निवडणुकीत सरनाईक यांच्यासमोर काँग्रेससोबतच स्वपक्षातील बंडखोरीचेही आव्हान होते. श्रीकांत देशपांडे यांच्या उमेदवारीमुळे लढतीची रंगत वाढली होती. त्यामुळे पहिल्या पसंतीतील आघाडी पुढील फेऱ्यांमध्ये टिकणार का, याबाबत उत्सुकता होती. अखेर सरनाईक यांनी विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पार केले.

२०२० मध्ये अपक्ष म्हणून विधान परिषदेत पोहोचलेल्या सरनाईक यांनी यंदा महायुतीच्या उमेदवाराच्या भूमिकेत निवडणूक लढवली. अपक्ष आमदार ते महायुतीचे विजयी उमेदवार, असा त्यांचा राजकीय प्रवास या निकालाने पुढे गेला आहे.

काँग्रेसने अदिती पोहरे यांच्या माध्यमातून उभे केलेले आव्हान विजयात बदलू शकले नाही. दुसरीकडे, बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा विजय शिंदे यांच्या शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरला आहे. मतमोजणीतील दीर्घ उत्कंठेनंतर अमरावतीच्या शिक्षक मतदारसंघात पुन्हा सरनाईक यांच्या नावावर विजयाची नोंद झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!