मुंबई/बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांवर पुन्हा एकदा पेपरफुटीचे काळे ढग दाटले आहेत. उद्या, रविवार २८ जून रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे स्थगित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परीक्षेच्या अवघ्या काही तासांपूर्वीच ठाणे-भिवंडी परिसरातून कथित प्रश्नपत्रिका जप्त झाल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना पेपरफुटीबाबत आधीच खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीने कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या संशयितांकडे प्रश्नपत्रिका कशी पोहोचली? यामागे कोचिंग क्लास चालकांचा हात आहे का? की शिक्षण विभागातीलच कुणी आतला माणूस या रॅकेटला मदत करत होता? या सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
राज्यभरातील लाखो उमेदवारांनी महिनोनमहिने अभ्यास करून या परीक्षेची तयारी केली होती. मात्र ऐन आदल्या दिवशी परीक्षा स्थगित झाल्याने परीक्षार्थींमध्ये तीव्र संताप उसळला आहे. “प्रामाणिक अभ्यास करणाऱ्यांच्या भविष्याशी हा सरळ खेळ आहे,” अशी भावना उमेदवारांमधून व्यक्त होत आहे.
वारंवार होणाऱ्या पेपरफुटींमुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. प्रत्येक वेळी विद्यार्थीच का बळी पडायचा? पेपरफुटी करणारे रॅकेट, त्यांना संरक्षण देणारे अधिकारी आणि पैशांच्या जोरावर परीक्षा विकणाऱ्या दलालांवर आता केवळ गुन्हा नव्हे, तर कठोर आणि आदर्श कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
शिक्षण विभागाकडून नवीन परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, या प्रकरणाचा तपास पोलीस आणि संबंधित विभागांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.











