spot_img
spot_img

BREAKING! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर तालुक्यातील युवक अमरावतीत ५० फुटांच्या टॉवरवर! दोन तासांपासून प्रशासनाची धावपळ; सारंगपूर ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ रेकॉर्डमध्ये नेमकं दडलंय काय?

अमरावती/मेहकर (हॅलो बुलढाणा) केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर तालुक्यातील सारंगपूर येथील तक्रारकर्ते गजानन बोरकर यांनी ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. अमरावती शहरातील सातूर्णा परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरवर सुमारे ५० फूट उंच चढून ते गेल्या दोन तासांपासून आंदोलन करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

बोरकर यांनी यापूर्वी मेहकर तालुक्यातील सारंगपूर ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, या तक्रारीवर अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. आपल्याला जबरदस्तीने खाली उतरविण्याचा प्रयत्न झाल्यास टोकाचे पाऊल उचलू, असा गंभीर इशारा त्यांनी दिल्याने परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. प्रशासन आणि बचाव पथकाकडून त्यांच्याशी संवाद साधून सुरक्षितपणे खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सारंगपूर ग्रामपंचायतीशी संबंधित विविध अभिलेख आणि रेकॉर्डमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार होऊ नये, यासाठी संपूर्ण कागदपत्रे तातडीने सील करावीत, ही बोरकर यांची प्रमुख मागणी आहे. सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली की नाही, याचीही निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासोबतच सारंगपूरमधील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच गावातील प्रलंबित नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी त्यांची मागणी आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर तालुक्यातील युवकाने थेट अमरावतीत टॉवरवर चढून आंदोलन केल्यामुळे या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासन बोरकर यांच्या मागण्यांबाबत कोणता निर्णय घेते आणि त्यांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात यश मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!