धाड (हॅलो बुलढाणा) धाड ग्रामपंचायतीच्या दिव्यांग निधीमध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत गावातील दिव्यांग बांधवांनी थेट धाड पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तब्बल २१३ दिव्यांग लाभार्थ्यांच्या हक्काचा पाच टक्के निधी २०२१ ते २०२६ या कालावधीत वाटप झाला नसल्याचा दावा करीत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवाजी भिका परमेश्वर यांच्यासह राजू अवसरमोल, मोहम्मद अकील अब्दुल कदीर, जहुर खा रुम खा, लक्ष्मण बावणे, सुरेश ब्राम्हणे, मोहम्मद मतीन सौदागर, विशाल गुंजाळ व अन्य दिव्यांग बांधवांनी १३ ऑगस्ट रोजी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीने स्वनिधीतील पाच टक्के रक्कम दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करणे आवश्यक आहे. मात्र, निधी उपलब्ध नसल्याचे सांगून लाभार्थ्यांना वर्षानुवर्षे त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे.
विशेष म्हणजे, माहिती अधिकारातून सन २०२० मध्ये दिव्यांग निधीत ९९ हजार रुपये शिल्लक असल्याची माहिती मिळाल्याचा दावा अर्जदारांनी केला आहे. त्यातून केवळ १० ते १५ जणांना पैसे वाटण्यात आले; उर्वरित रकमेचा हिशेबच दिला जात नसल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
तत्कालीन ग्रामसेवक रवींद्र किसनराव बोबडे यांनी निधीचा कथित अपहार केल्याचा आरोप करीत संपूर्ण आर्थिक व्यवहारांची चौकशी, गुन्हा दाखल करण्याची कारवाई आणि दिव्यांगांना हक्काचा निधी तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. या आरोपांबाबत संबंधित ग्रामसेवक व ग्रामपंचायतीची बाजू अद्याप समोर आलेली नाही.












Total Users : 3293443