बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भीमजयंतीसारख्या पवित्र उत्सवानंतर शहरात थरारक खूनकांड घडल्याने प्रभाग क्रमांक 2 हादरला आहे. रॅलीत सहभागी झालेल्या पप्पू उर्फ सागर भाऊराव जाधव (वय 38) याची गुप्तीने भोसकून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना रात्री सुमारे 11 वाजता बाजार लाईनमधील लालाजी आईस्क्रीम समोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रॅली संपवून घरी परतत असताना कैकाडीपुरा येथील सोनू वसंत जाधव (वय 21) याने आधीच डाव साधून पप्पूवर अचानक हल्ला चढवला. बेसावध अवस्थेत असलेल्या पप्पूला काही कळण्याच्या आतच वार करण्यात आले आणि तो जागीच कोसळला. हल्ल्यानंतर आरोपी सोनू फरार झाला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
गंभीर जखमी अवस्थेत पप्पूला स्कुटीवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली.
सर्व रॅली शांततेत पार पडल्या असताना हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत विविध चर्चा रंगत आहेत. काही ठिकाणी अनैतिक संबंधाचा कोनही समोर येत आहे. मात्र, खरा कारणमीमांसा आरोपीच्या अटकेनंतरच स्पष्ट होणार आहे.











