मोताळा (हॅलो बुलढाणा) नगरपंचायत हद्दीतील आठवडी बाजारात ठेका संपल्यानंतरही कंत्राटदारांकडून सुरू असलेल्या अवैध वसुलीचा प्रकार उघडकीस आला असून शहरात संतापाची लाट उसळली आहे. ॲड. रहीम शाह यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीसाठी दिलेला लिलाव ठेका संपल्यानंतरही 9 एप्रिल रोजी बाजारात व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने वसुली करण्यात आली. ठरावातील शुल्कापेक्षा जास्त रक्कम उकळून व्यापाऱ्यांची सरळ लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या महसुलालाही फटका बसत असल्याचे नमूद करण्यात आले.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते रमेश धुनके यांनी कंत्राटदारांना जाब विचारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रकरण अधिकच तापले आहे.
संबंधित कंत्राटदारावर भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये फसवणूक, विश्वासघात व जबरदस्तीने वसुलीचे गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.











