लोणार (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या दमट आणि बदलत्या हवामानाने आता थेट जीव घेण्यास सुरुवात केली आहे. सापांचे वाढलेले हालचाली आणि त्यातून निर्माण होणारा धोका पुन्हा एकदा समोर आला असून, लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे एका 19 वर्षीय तरुणीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुमारी साक्षी रवींद्र सानप ही शुक्रवारी रात्री आपल्या घरात आई-वडिलांसोबत झोपलेली होती. रात्रीच्या सुमारास एका विषारी सापाने तिला दंश केला. मात्र, सुरुवातीला कोणतीही तीव्र लक्षणे दिसली नाहीत. सकाळी उठल्यानंतर साक्षीला घशात त्रास आणि अस्वस्थता जाणवू लागली. कुटुंबीयांनी हा त्रास ॲसिडिटीचा असल्याचा समज करून घेतला; मात्र काही वेळातच तिची प्रकृती खालावत गेली.
तिला तातडीने लोणार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांना सर्पदंशाची लक्षणे दिसून आल्याने तिला पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात नेत असतानाच साक्षीने रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला.
घटनेनंतर शेजारील अंगणात तोच साप आढळून आल्याने सर्पदंशाची शक्यता खरी ठरली. साक्षी ही सुलतानपूर येथील बी. फार्मसी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्या अकाली मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, बदलत्या हवामानात सापांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.










