जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट चलनी नोटांचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद येथे उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामवर खुलेआम 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांची विक्री करण्याची जाहिरात टाकणाऱ्या युवकावर पोलिसांनी कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे.
पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय वेरुळकर यांच्या तक्रारीवरून आरोपी राहुल अनिल पवार (वय 23, रा. वाडी बु.) याच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत कलम 66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 31 मार्च रोजी सकाळी सापळा रचत आरोपीच्या घरी छापा टाकला. तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये shankar_bhosale_ या इंस्टाग्राम आयडीवरून “second currency” नावाने बनावट नोटा विक्रीसाठी व्हिडिओ पोस्ट केल्याचे स्पष्ट झाले. या व्हिडिओमध्ये नोटा मोजण्याच्या मशीनद्वारे पैसे मोजताना “माल हवा असेल तर कॉल करा” असे उघडपणे सांगितले जात होते.
पोलिसांनी आरोपीकडून ओप्पो रेनो 11 प्रो मोबाईल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर वाढत्या सायबर गुन्ह्यांचा गंभीर धोका पुन्हा एकदा समोर आला आहे.
नागरिकांनी अशा फसव्या जाहिरातींपासून सावध राहावे, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.










