बुलढाणा (हॅलो बुलढाणा) श्रद्धेच्या यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाने अक्षरशः झडप घातली! सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या बागवान कुटुंबावर मेहकर तालुक्यातील नांद्रा फाटा येथे भीषण अपघात कोसळला. भरधाव पिकअप वाहनाचा ताबा सुटताच गाडी थेट उलटली आणि क्षणात आनंदाचा प्रवास शोकांतिका ठरला.
या भीषण अपघातात अरमान शरीफ बागवान (१६) आणि रिहान सैदु बागवान (१७) या दोन अल्पवयीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. वाहनाखाली अडकून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून बागवान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातावेळी वाहनात एकाच कुटुंबातील तब्बल 23 भाविक प्रवास करत होते. वाहन उलटल्याने 16 जण गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर रुग्णांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, चालकाला झोप लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून वाहनावरील नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, यामुळे पुन्हा एकदा प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार संजय रायमुलकर, योगेश सौभागे आणि विलास आखाडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. जखमींना रुग्णालयात पोहोचवणे, उपचारांची व्यवस्था करणे, तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी मानवतेचा हात दिला.










