spot_img
spot_img

वर्दीचं स्वप्न अधुरं! भरतीच्या मैदानात कोसळला बुलढाण्याचा युवक; कुटुंबाचा एकमेव आधार हरपला

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खाकी वर्दीचं स्वप्न डोळ्यांत साठवून आयुष्य बदलण्याच्या आशेने मैदानावर उतरलेल्या युवकाचा धावता धावता मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पुणे येथे सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

पुरुषोत्तम भीमराव बुरुकुल (रा. चिंचोली बोरे, ता. देऊळगाव राजा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आणि दोन बहिणींचा लाडका भाऊ असलेल्या पुरुषोत्तमवरच कुटुंबाची सर्व जबाबदारी होती. वडील आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले असल्याने घराचा कणा बनण्याची जिद्द त्याने मनाशी बांधली होती. पोलीस बनून कुटुंब उभं करण्याचं त्याचं स्वप्न होतं.

पोलीस भरतीतील 1600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तो पूर्ण ताकदीने धावत होता. दोन फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या फेरीदरम्यान अचानक त्याला चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला. उपस्थितांनी तातडीने त्याला रुग्णालयात हलवलं, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार त्याला झटका (फिट) आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेची बातमी गावात पोहोचताच एकच हंबरडा फोडला गेला. आईच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर, बहिणींचा आक्रोश आणि वडिलांची निशब्द वेदना पाहून गावकऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी आलं. ज्या खांद्यावर कुटुंबाचा भार होता, तोच खांदा आज कायमचा निघून गेल्याने चिंचोली बोरे गाव शोकमग्न झाले आहे.

वर्दीचं स्वप्न पाहणारा पुरुषोत्तम स्वतःच्या आयुष्याची शर्यत हरला, पण मागे एक न संपणारी पोकळी आणि दुःखाचा डोंगर ठेवून गेला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!