spot_img
spot_img

प्रशासनाचा दणका! चिखलीत रेणुका पेट्रोल पंपावर गुन्हा; नियम तोडत खुल्या कंटेनरमध्ये इंधन विक्री

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) जिल्ह्यात इंधन वितरण सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. याच पार्श्वभूमीवर चिखलीतील जालना रोडवरील रेणुका पेट्रोल पंप प्रशासनाच्या रडारवर आला असून, खुल्या कंटेनरमध्ये इंधन विक्री केल्याप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या स्पष्ट आदेशानुसार पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच देणे बंधनकारक आहे. कॅन, बाटल्या किंवा उघड्या भांड्यांमध्ये इंधन देण्यास कडक मनाई करण्यात आली आहे. मात्र, २६ मार्च रोजी रेणुका पेट्रोल पंपावर या नियमांना सर्रास फाटा देत उघड्या टाक्या व कंटेनरमध्ये इंधन विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

या गंभीर प्रकाराची दखल घेत तहसील कार्यालय चिखली येथील पुरवठा निरीक्षक रविंद्र संजय वाघ यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात पेट्रोल पंप मालकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ आणि २८७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार कैलास चतरकर पुढील तपास करत आहेत.

या बेकायदेशीर प्रकारामुळे मोठा अपघात किंवा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. “नियम तोडाल तर कारवाई अटळ!” असा थेट इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून इंधन साठवणूक करू नये, पुरवठा मुबलक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, सर्व पेट्रोल पंप चालकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा यापुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!