spot_img
spot_img

‘भाजी कच्ची’चा राग इतका? थेट हॉटेल जाळण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

खामगाव (हॅलो बुलढाणा) भाजी कच्ची असल्याच्या किरकोळ वादातून थेट सूडाची आग पेटल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव तालुक्यात समोर आला आहे. टेंभुर्णा फाटा ब्रिजजवळ अकोला रोडलगत असलेल्या ‘चांगभल’ हॉटेलवर अज्ञातांनी आग लावण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेलोडी येथील योगेश शिवाजीराव जाधव (वय 40) यांनी टेंभुर्णा येथील कुसुम सोळंके यांच्या शेतालगत टीनशेडमधील जागा भाड्याने घेऊन 20 फेब्रुवारी 2026 रोजी ‘चांगभल’ नावाचे हॉटेल सुरू केले होते. 1 मार्चच्या रात्री टेंभुर्णा येथील काही युवक भाजी पार्सल घेण्यासाठी आले होते. त्यांनी “भाजी कच्ची आहे” असा आक्षेप घेत वाद घातल्याचे सांगितले जाते. त्यावेळी जाधव यांनी भाजी बदलून देण्याची किंवा पैसे परत देण्याची तयारी दर्शवली होती; मात्र वाद वाढल्याची माहिती आहे.

दरम्यान, 12 मार्चच्या रात्री हॉटेल बंद करून जाधव घरी गेले असताना 13 मार्च रोजी पहाटे 1.28 वाजता त्यांना फोनवरून “तुमच्या हॉटेलला आग लागली आहे” अशी माहिती मिळाली. ते तात्काळ कुटुंबीयांसह घटनास्थळी पोहोचले असता हॉटेलसमोरील रंगीत नेट आणि कंपाउंडची हिरवी जाळी जळालेली दिसून आली.

यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर आलेम टिकार व त्याच्यासोबत दोन अज्ञात व्यक्ती हॉटेलसमोरील जाळीला आग लावताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेत अंदाजे २ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस हवालदार बालकृष्ण फुंडकर पुढील तपास करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!