बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात सायबर गुन्ह्याचा अत्यंत संतापजनक आणि अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका विवाहित महिलेचा मोबाईल हॅक करून तिच्या खासगी आयुष्यात घुसखोरी करत तिला ब्लॅकमेल करून विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी ऋषिकेश गिरी (वय 27) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अत्यंत चलाखीने पीडित महिलेचा मोबाईल हॅक करून तिच्या व्हॉट्सअॅप चॅट, गॅलरीतील खासगी फोटो आणि ई-मेल खात्याचा ताबा मिळवला. त्यानंतर या गोपनीय माहितीचा आधार घेत आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. महिलेचे खासगी फोटो तिच्या पतीसह नातेवाईकांना पाठवून बदनाम करण्याची धमकी देत आरोपीने तिचा मानसिक छळ सुरू केला.
सायबर विकृतीची परिसीमा गाठत आरोपीने महिलेला विवस्त्र होण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर त्या कृत्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते तिच्या बहिणीला पाठवल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती.
ब्लॅकमेल करत आरोपीने पीडितेकडे शारीरिक संबंधांची मागणी देखील केली. तसेच मागणी मान्य न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. अखेर सततच्या छळाला कंटाळून पीडित महिलेने सोनाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत कलम 66(E) आणि 67(A) नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी ऋषिकेश गिरी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून सायबर गुन्ह्यांविषयी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.












