मेहकर (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील हिवरा खुर्द परिसरात अवैध गौण खनिज उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून पुण्यातील वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापकांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून तब्बल 29 कोटींहून अधिक रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणी मेहकरचे तहसीलदार निलेश भिवाजी मडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून कायम अप. क्र. 126/2026 अन्वये भादंवि कलम 379 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि खाण व खनिज अधिनियम 1957 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द (सारंगवाडी) येथील गट क्रमांक 549 मध्ये सप्टेंबर 2013 ते एप्रिल 2015 या कालावधीत वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने कोणतीही शासकीय परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे उत्खनन केले. तसेच विनापरवानगी गिट्टी क्रशर मशीन उभारून चालविल्याचेही आढळून आले आहे.
सदर कंपनीने तब्बल 10,64,320 घनमीटर म्हणजेच 3,76,084 ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे तपासात समोर आले आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने फेरचौकशी करून कंपनीवर 22 कोटी 56 लाख 50 हजार 400 रुपये तसेच दुसऱ्या आदेशानुसार 6 कोटी 62 लाख 26 हजार 724 रुपये असा एकूण 29 कोटी 18 लाख 77 हजार 124 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मात्र एवढा मोठा दंड आकारूनही कंपनीकडून रक्कम जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार आता थेट फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अनिल सुरेशचंद्र मुंदडा आणि हर्षद सुरेश मुंदडा यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि संतोष जाधव करीत आहेत. या कारवाईमुळे मेहकर तालुक्यात खळबळ उडाली आहे.












