spot_img
spot_img

💥EXCLUSIVE हजारो भाविकांना रोज महाप्रसाद! गॅस नाही… तरी कसे चालते शेगावचे स्वयंपाकघर?

शेगाव (हॅलो बुलडाणा/ महेंद्र मिश्रा) जगभरात पेट्रोलियम पदार्थांच्या तुटवड्याची चर्चा सुरू असताना अनेक मंदिर व देवस्थानांना गॅस सिलेंडरच्या नियोजनाचा प्रश्न भेडसावत आहे. मात्र संत नगरी शेगावमधील श्री संत गजानन महाराज संस्थान पुन्हा एकदा दूरदृष्टी आणि नियोजनामुळे आदर्श ठरताना दिसत आहे.

दररोज हजारो भाविकांना मोफत महाप्रसाद देण्याची परंपरा जपणाऱ्या संस्थानने महाप्रसाद तयार करण्यासाठी सौर ऊर्जा आणि स्टीम बॉयलरची प्रभावी व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा किंवा वाढत्या दरांचा संस्थानच्या महाप्रसाद सेवेला कोणताही फटका बसत नाही. ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थानने आधुनिक व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला आहे.

सध्या अमेरिका-इराक युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये पेट्रोलियम पदार्थांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम उद्योग-व्यवसायांसह अनेक धार्मिक संस्थांवरही होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचे काटेकोर नियोजन करावे लागत असताना शेगाव संस्थान मात्र या संकटापासून पूर्णपणे सुरक्षित असल्याचे चित्र आहे.

महाप्रसादालयात स्टीम बॉयलरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अन्न तयार केले जाते. स्वच्छता, शिस्त आणि नम्र सेवा या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या संस्थानच्या व्यवस्थापनामुळे दररोज हजारो भाविकांना सुरळीत आणि स्वच्छ पद्धतीने महाप्रसाद मिळतो.ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि भक्तसेवा यांचा सुंदर संगम घडवत गजानन महाराज यांच्या संस्थानने पुन्हा एकदा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

या संपूर्ण व्यवस्थेचा सविस्तर आढावा ‘हॅलो बुलढाणा’चे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी घेतला असून, संस्थानच्या व्यवस्थापनाचे भाविकांकडून कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!