नांदुरा (हॅलो बुलढाणा) कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 20 लाख 86 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील चांदुरबिस्वा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नांदुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदुरबिस्वा येथील मोहम्मद लतीफ मोहम्मद हनीफ (वय 45) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गावातील अफरोज खान दिलावर खान याने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देतो, असे सांगून गावातील सात जणांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी कोणतेही कागदपत्र लागत नसून फक्त अर्जावर सही करायची आहे, असे सांगत त्याने काही छापील फॉर्म भरून घेतले.
त्यानंतर संबंधितांची बँक ऑफ इंडिया/स्टेट बँक शाखा नांदुरा येथे खाती उघडण्यात आली. जून 2024 मध्ये प्रत्येकाच्या खात्यात सुमारे 2 लाख 99 हजार रुपयांचे कर्ज जमा झाल्यानंतर आरोपीने “महामंडळाचे अधिकारी गावात येऊन कार्यक्रमात कर्ज वाटप करतील” असे सांगत पैसे काढून घेण्याचा डाव रचला.
27 व 28 जून 2024 रोजी आरोपीने फिर्यादीकडून कोरा चेक घेऊन त्यांच्या खात्यातील सुमारे 2 लाख 98 हजार रुपये काढून घेतले. त्याचप्रमाणे इतर सहा जणांकडूनही अशीच रक्कम घेत एकूण 20 लाख 86 हजार रुपये स्वतःकडे घेतले. मात्र त्यानंतर आरोपीने पैसे परत न देता गाव सोडून पळ काढला.
दरम्यान, एप्रिल 2025 मध्ये संबंधितांना महामंडळाकडून कर्जफेडीची नोटीस आल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी अफरोज खान दिलावर खान याच्याविरुद्ध भादंवि कलम 420, 468, 471 व 473 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.












