बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील संगम चौक परिसरात रविवारी उशिरा रात्री धक्कादायक प्रकार घडला. रात्री सुमारे 12.वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी भर रस्त्यात दुचाकीसह एका व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळघाट येथील पोलिसमित्र गफ्फर खान यांची दुचाकी संगम चौकात उभी असताना दोन जण अचानक आले आणि त्यांनी दुचाकीला आग लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीसह संबंधित व्यक्तीला जाळण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू होती.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस आणि अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र आग इतकी भीषण होती की दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली.
या घटनेमागे काही वैयक्तिक वाद असल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.












