लोणार (हॅलो बुलडाणा) लोणार तालुक्यातील वेणी येथील ई क्लास व एफ क्लास सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढून चारही बाजूंनी तार कुंपण करून द्यावे,अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य राजकुमार दळवे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
सद्यस्थितीत वेणी तलाठी कार्यालय अंतर्गत एफ क्लास व ई क्लास वेणी भाग एक मधील गट क्रमांक 193, 195, 353, 356, 357 आणि भाग दोन मधील गट क्रमांक 769, 770 व 800 या सरकारी जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. शासनाने मोजमाप करून आणि हद्द कायम ठेवून सदर गटांच्या जमिनीच्या चारही बाजूंनी तार कुंपण घालून अतिक्रमण काढावे व अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजकुमार दळवे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. यापूर्वीही गावकऱ्यांच्या स्वाक्षरीसह ही मागणी लोणार येथील तहसीलदारांना करण्यात आली होती.परंतु आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे मागण्यांची पूर्तता न झाल्यास लोकशाही मार्गाने एक जुलै रोजी लोणार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दळवे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.