खामगाव (हॅलो बुलडाणा) बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील जलम रेल्वे मार्गावर 19 वर्षीय तरुण विद्यार्थी ओम विठ्ठल गिरे याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून, प्राथमिक तपासात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नातेवाईकांनी खळबळजनक आरोप करत हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.ओम गिरे हा खामगाव येथील आयटीआय संस्थेत फिटर ट्रेडचे शिक्षण घेत होता. मूळचा देऊळगाव मारी तालुका मेकर येथील रहिवासी असलेल्या ओमने खामगावच्या अमृत नगर परिसरात भाड्याने खोली घेतली होती. घटनेच्या एक दिवस आधी त्याने आपल्या कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला.
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता, मृतदेहाजवळ ओमचे घड्याळ आणि मोबाईल दोन्ही दगडाने फोडून टाकण्यात आल्याचे आढळले. यामुळे नातेवाईकांनी या घटनेवर आक्रमक पवित्रा घेत खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. “ही आत्महत्या असूच शकत नाही, त्याला कुणीतरी मारलं आहे,” असा आरोप नातेवाईकांनी केला.पोलिसांनी मात्र सध्या आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. ओमचा मृत्यू घातपात, अपघात की आत्महत्या, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, खामगाव परिसरात या घटनेनंतर भीतीचे वातावरण पसरले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ओमच्या अचानक जाण्याने कुटुंबियांसह मित्रपरिवार हळहळ व्यक्त करत असून, या प्रकरणात सत्य बाहेर येण्यासाठी पोलिसांनी योग्य तपास करावा, अशी मागणी होत आहे. आता या प्रकरणातील सत्य काय, हे तपासाअंती स्पष्ट होईल.