बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अलीकडे फसवणुकीचे प्रकार वाढले आहे.कोण कधी आणि कशी फसवणूक करेल याचा नेम राहीला नसून, खामगाव तालुक्यातील मौजे कोक्ता येथे 3 भामट्या एजंटनी प्लॉट विक्रीमध्ये लाखोंची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तक्रारदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.
नितीन खंडारे, मिलिंद जनार्दन खंडारे ( दोघे रा.सागर कॉलनी वाशिम बायपास रोड अकोला) व गोवर्धन श्रीकृष्ण ताठे (रा. माक्ता कोक्ता ता. खामगाव ) असे या आरोपी एजंटचे नाव आहे. या आरोपींनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील मौजे कोक्ता येथील गट नंबर 105 मधील प्लॉट स्वतःचे आहे असे खोटे सांगून 50 हजार ते 2 लाख रुपये ऍडव्हान्स घेऊन तक्रारदारांची फसवणूक केली असा आरोप करण्यात आला आहे. सदर प्लॉट दुसऱ्याच मालकाचे असून तक्रारदारांना नाईलाजाने प्लॉटच्या मूळ मालकाला पूर्ण पैसे स्वतः जवळून एकाच वेळेस देऊन प्लॉट खरेदी करावे लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे.सदर आरोपी हे ऍडव्हान्स मध्ये घेतलेले पैसे परत करण्यास तारखेवर तारीख देत असून टाळाटाळ करत आहेत.त्यामुळे फसवणूक करणाऱ्या या भामट्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि आमचे पैसे आम्हाला मिळावे, अशी मागणी तक्रारदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनातून केली आहे.या निवेदनावर मंगेश शंकर कावरे, निवृत्ती ज्ञानदेव अंभोरे, बाळू सिताराम आडे, तुळशीराम दयाराम वसोकार, वंदना संजय लांडे, योगिता श्रीरंग गायकवाड, पवनकुमार सुधाकर काटे, लता गोपाल राउत,वासुदेव विठ्ठल बोडखे यांची स्वाक्षरी आहे.














