spot_img
spot_img

BREAKING बुलढाणा रणभूमी बनलं! युवक काँग्रेस-आम.गायकवाड समर्थक आमने-सामने!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘शिवाजी कोण होता?’ या वादग्रस्त पुस्तकावरून बुलढाण्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत असून आज शहरात अक्षरशः रणांगणासारखी परिस्थिती निर्माण झाली. युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात आले, आणि याच ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी जोरदार हजेरी लावत दोन्ही गट आमनेसामने उभे ठाकले.

घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. युवक काँग्रेस कार्यकर्ते पुस्तकाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते, तर गायकवाड समर्थकांनी त्याला जोरदार विरोध दर्शवत प्रतिघोषणा दिल्या. काही क्षणांसाठी वातावरण इतकं तापलं की परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली होती.

दरम्यान, काल भारतीय कम्युनिस्ट पक्ष व इतर डाव्या संघटनांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप होत असताना आजचा संघर्ष अधिकच तीव्र झाला. शहरात आधीच तणावपूर्ण वातावरण असताना या घटनेने पेटत्या आगीत तेल ओतल्यासारखं काम केलं.

सुदैवाने, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना आटोक्यात आणलं आणि संभाव्य हिंसाचार टळला. मात्र, या घटनेनंतर बुलढाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापलं असून पुढील काही दिवस परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकूणच, ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता थेट रस्त्यावर उतरला असून बुलढाणा शहरात तणावाची ठिणगी भडकली आहे. प्रशासनासाठी ही मोठी कसोटी ठरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!