लोणार (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील वढव गावात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीने अक्षरशः हाहाकार माजवला. काही क्षणांतच ६ ते ७ शेतकऱ्यांची घरे ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडली आणि आयुष्यभराचा संसार राखेत परिवर्तित झाला. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अनेक कुटुंबे बेघर झाली असून त्यांच्या डोळ्यांत केवळ मदतीची आस आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या सोबत मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनीही रात्री दीड वाजता उपस्थित राहत परिस्थिती हाताळण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे मेहकर व लोणार येथून अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरीत दाखल झाल्या आणि पहाटे चारपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या प्रसंगी तहसीलदार भूषण पाटील व अॅड. आकाश घोडे यांचीही उपस्थिती होती. प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून आमदारांनी आगीत बाधित कुटुंबांना योग्य भरपाई मिळवून देण्याची ठाम ग्वाही दिली आहे.
या संकटाच्या काळात आमदार आणि नगराध्यक्षांनी दाखवलेली तत्परता व संवेदनशीलता कौतुकास्पद ठरत असून, खरी लोकसेवा काय असते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे










