जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) भाजपा कार्यकर्ते आणि आमदार संजय कुटे यांच्या वाहनावर एकेकाळी ड्रायव्हर राहिलेले व ठेकेदारीचा व्यवसाय करणारे पंकज देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल संध्याकाळी साडेसात वाजता समोर आली आहे.परंतु त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खूणा दिसत असल्याने ही आत्महत्या की घातपात? असा संशय बळावला असून,पोलीस यंत्रणा शोध घेत आहे.
जळगाव जामोद येथील भाजपाचे कार्यकर्ते पंकज देशमुख हे सुस्वभावी होते. त्यांनी आमदार संजय कुटे यांच्या वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम केलेले आहे.नंतर त्यांनी ठेकेदारीचा व्यवसाय सुरू केला होता. मध्यंतरी त्यांनी शेती विकत घेतल्याने काही वाद उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान काल संध्याकाळी साडेसात वाजता पळसाच्या झाडावर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा देखील दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली किंवा त्यांचा घातपात झाला असा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांना अकोला मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी पोलीस शोध घेत असून अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याचे कळते.














