बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र मराठा सोयरीक या सामाजिक चळवळीच्या वतीने समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यावर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे आयोजित भव्य वधुवर परिचय मेळाव्यात सौ. मालिनीताई सवडदकर आणि श्री. शिवाजीराव तायडे यांना प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
ज्येष्ठ साहित्यिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. मालिनीताई सवडदकर यांना ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. बीएसएनएलच्या सहाय्यक महाव्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या सवडदकर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील जटिल प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्या अनेक पुरस्कारप्राप्त कादंबऱ्यांच्या लेखिका असून, विवाह जुळविण्याच्या कार्यातही त्यांनी पाचशेहून अधिक संसार फुलवले आहेत.
तर जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष आणि अंभोडा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवाजीराव तायडे यांना “अंभोडा भूषण” पुरस्कार जाहीर झाला आहे. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. तसेच प्रत्येक मेळाव्यात गरजूंसाठी भोजन व्यवस्था करण्यासाठी त्यांचा मोलाचा सहभाग असतो.
हा पुरस्कार वितरण सोहळा मुक्ताईनगरचे लोकप्रिय आमदार माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे. बुलढाणा जिल्हा महिला मराठा सोयरीक संघाच्या अध्यक्षा सुरेखा सावळे यांनी समाजबांधवांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.