लोणार (हॅलो बुलडाणा) कुत्र्यांनी ताकदीनिशी पाठलाग केला.. निलगाईचे पिल्लू जीवाच्या आकांताने धावले..परंतु ते पळत असताना तीस फूट खोल विहिरीत पडले.या पिल्लाच्या दोन्ही बाजूने मृत्यू असताना देखील हे पिल्लू सर्पमित्र विनय कुलकर्णी यांच्या मूळे सुखरूप बाहेर पडले.
झाले असे की,सर्पमित्र विनय कुलकर्णी व सचिन कापुरे यांनी सरस्वती येथील शेतकरी श्री गोविंद संतोषराव जाधव यांच्या मातमळ रोड वरील शेतात असताना त्यांच्या समोरच काही कुत्रे निलगाईच्या पिल्लाला पकण्यासाठी त्याच्या मागे धावत होते, विहरीला कठडा नसल्यामुळे धावताना चुकून हे पिल्लू विहीरीत पडले, त्यांनी याची सूचना विनय कुलकर्णी यांना दिली, तात्काळ घटनास्थळी पोहचून तीस फूट खोल विहीरीत उतरून दोर खंडाच्या सहाय्याने निलगाईच्या पिल्लाला विनय कुलकर्णी यांनी बाहेर काढले, यावेळी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी मुसळे यांनी त्यावर प्राथमिक उपचार केले आणि वनरक्षक कैलाश चौधरी यांच्या उपस्थितीत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. दरम्यान जमिनी लगत असलेल्या विहरिना एकतर जाळी लावावी नाहीतर कमीत कमी दोन ते तीन फूट उंच कठडा बांधावा जेणे करून असे अपघात घडणार नाहीत असे आवाहन सर्पमित्र विनय कुलकर्णी व सचिन कापूरे यांनी केले.