चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय माणिकराव गाडेकर यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाला दिलेल्या पत्रात त्यांनी संघटनेसाठी आवश्यक वेळ देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.आज दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी गाडेकर यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही काळापासून गाडेकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले होते. त्यांच्या या राजीनाम्यामुळे पक्ष संघटनेच्या कामकाजावर प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चिखली येथील संजय गाडेकर हे पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जात होते. त्यांच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गाडेकर यांच्या पुढील राजकीय पाऊलाबाबतही तर्क-वितर्क लावले जात आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी घडत असताना हा राजीनामा पक्षासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.














