अमडापूर (हॅलो बुलडाणा /अनिल राठोड) अमडापूर ते केनवड मार्गावरील लावणा नजीकच्या पुलाच्या बांधकामात ठेकेदारांकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत. पुलाच्या लेव्हलिंगसाठी काळ्या व लाल मातीचा वापर करण्यात येत असून, दर्जाहीन साहित्याचा वापर करून हे काम सुरू आहे. यामुळे या पुलाच्या टिकाऊपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याने ठेकेदार मनमानी करत आहेत. शासनाने मंजूर केलेल्या निकषांचे उल्लंघन होत असून, जनतेच्या सुरक्षिततेसह विकास निधीचा गैरवापर देखील होत आहे.
स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या असल्या तरी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. या हलगर्जीपणामुळे अपघाताची शक्यता वाढली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्त्यांवरील ही ठेकेदारराज आणि अधिकाऱ्यांची निष्क्रियता यामुळे तेथील जनतेचा रोष उफाळून येत आहे.