सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील पांगरी उगले गावातून धक्कादायक हनीट्रॅप प्रकरण समोर आले आहे. सपना ऊर्फ राणी, वय अवघे २३ वर्षे; पण पोलिसांच्या माहितीनुसार तिच्या कारनाम्यांनी अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. सोशल मीडियावरून ओळख वाढवायची, सावजाला गोड बोलून हॉटेल किंवा लॉजपर्यंत ओढायचे, आणि नंतर साथीदारांच्या मदतीने अश्लील व्हिडीओ तयार करून ब्लॅकमेलिंगचा काळा धंदा चालवायचा, असा या टोळीवर आरोप आहे.
या प्रकरणात जालना पोलिसांनी सपना निकाळजेसह अविनाश गणेश झोटे, अर्जुन चमन बहादूर-राजपूत, शंकर माणिक जाधव, अतिश सतीश गायकवाड आणि सचिन लक्ष्मण कंठाळे यांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, खंडणीची रक्कम सचिन कंठाळेच्या यूपीआय आयडीवर घेतली जात होती. ही टोळी सावजाला आधी जाळ्यात ओढायची, नंतर धमकी, मारहाण आणि बदनामीची भीती दाखवून पैसे उकळत होती.
या हनीट्रॅपच्या काळ्या जाळ्याने याआधी छत्रपती संभाजीनगरात एक संसार उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप आहे. २ मे रोजी आडगाव ठोंबरे शिवारात २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. या प्रकरणात सपना आणि तिचा साथीदार ज्ञानेश्वर गणेश बोचरे यांना करमाड पोलिसांनी अटक केली होती. संबंधित तरुणालाही हॉटेलवर बोलावून अश्लील व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करण्यात आले, ३ लाखांची मागणी झाली आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्या तरुणाच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात चार महिने कारागृहात राहिल्यानंतर सपना बाहेर आली आणि पुन्हा त्याच मार्गाने ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केल्याचा पोलिसांचा संशय आहे. २० जून रोजी जालन्याच्या नवीन मोंढा रोडवर एका बोलेरो चालकाला जाळ्यात अडकवून ड्रायपोर्टकडे नेण्यात आले. त्याला मारहाण करून मोबाइल आणि रोख रक्कम हिसकावण्यात आली. त्यानंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत नातेवाइक व मित्रांकडून फोन-पेद्वारे पैसे उकळण्यात आल्याची तक्रार २३ जून रोजी चंदनझिरा पोलिसांत दाखल झाली.
तक्रारीनंतर जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात शोधमोहीम राबवून सपनाला जालना येथील देऊळगाव राजा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने साथीदारांची नावे सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने बोलेरो चालकाकडून सुमारे २ लाख रुपयांची खंडणी उकळल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बदनामीच्या भीतीने अनेक पीडित पुढे येत नसल्याने अशा टोळ्यांची हिंमत वाढते. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी केले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातून समोर आलेल्या या हनीट्रॅप प्रकरणाने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.










