बुलढाणा (हॅलो बुलडाणा) संगम चौकातील एका धार्मिक स्थळाची संरक्षण भिंत तोडून व्यावसायिक गाळे उभारले जात असून, त्या गाळ्यात चिकन व मटण दुकाने सुरू केल्याने नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सलमान खान यांनी केला आहे. यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने सलमान खान यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
सलमान खान यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव विश्राम पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक वारे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, सचिव चंद्रकांत बर्दे, जिल्हाध्यक्ष अनंता शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“धार्मिक भावना दुखावणाऱ्या अतिक्रमणाची तत्काळ दखल घ्या,” अशी ठाम मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सलमान खान यांचे उपोषण जिल्ह्यात चांगलेच गाजत असून, प्रशासनाच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.