मलकापूर (हॅलो बुलडाणा) मलकापूरमधील नूतन विद्यालयाजवळील हॉटेल रोहिणीत सोमवारी रात्री दारुच्या नशेत सहा जणांनी गोंधळ घालत कर्मचाऱ्याशी वाद घातला. वादादरम्यान देवा ठाकूर नावाच्या व्यक्तीने ईश्वर बोबडे यांच्या गळ्यातील महागडी सोन्याची चेन हिसकावल्याने खळबळ उडाली आहे.
हॉटेल मालक केदार एकडे यांनी तत्काळ पोलिसांत फिर्याद दाखल केली. या तक्रारीवरून देवा ठाकूर आणि त्याच्या सहा साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, देवा ठाकूर आणि सहकारी हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी आले होते. बिलाच्या वादातून त्यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत मारामारी केली आणि यावेळी चेन हिसकावण्याचा प्रकार घडला.
घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कवळासे करत आहेत. या घटनेने मलकापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.














