खामगाव (हॅलो बुलडाणा) “कानून के हात लंबे होते है” हा डायलॉग जलंब पोलिसांनी प्रत्यक्षात साकारत तब्बल एक वर्षापूर्वी चोरी गेलेली क्रूझर गाडी (एमएच १९ सीयू ३६७२) चोरट्यासह जप्त केली आहे. पोलिसांच्या या दमदार कामगिरीची परिसरात मोठी चर्चा आहे.
विनोद वाकोडे (रा. माटरगाव, ता. शेगाव) यांच्या घरासमोर २३ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्री ही गाडी चोरीला गेली होती. जलंब पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तब्बल एक वर्षानंतर पोलीस हवालदार सचिन बावने यांना गाडी व आरोपीबाबत गुप्त माहिती मिळाली. ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जलंब पोलिसांनी तपासाला गती देत ५ जानेवारी २०२५ रोजी माटरगाव येथे सापळा रचून आरोपी शिवलालसिंग हरीचंदसिंग राजपूत याला अटक केली.
ही मोठी कामगिरी पीएसआय श्याम पवार, देव साहेब, पोहेकॉ सचिन बावने, रवींद्र गायकवाड, गोविंदा व्होनमाने, अमोल कवळे, संदीप गावंडे, रितेश मसने यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साध्य झाली. पोलिसांनी गाडी मालकास परत देऊन न्यायाची जाणीव पुन्हा जिवंत केली आहे.
जलंब पोलिसांची ही शौर्यगाथा चोरट्यांना दणका देणारी असून, कायद्याचे बळ आणि पोलिसांचे शौर्य पुन्हा सिद्ध करणारी ठरली आहे.