बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सद्भावना सेवा समिती व सिंहनाद सेवासंघ, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार विद्या मंदिर सभागृहात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ‘बुध्द चरित्र भगवंत कथेची अमृतवर्षा’ या त्रिदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, महापंडीत भिक्षु प्रियदर्शी थेरोजी यांच्या मार्गदर्शनातून तथागत गौतम बुध्दाचे जीवनकार्य श्रवण करण्याची संधी लाभणार आहे.
सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सांगितले की, “बुलडाण्यात पहिल्यांदाच असा ऐतिहासिक कार्यक्रम होत असून, या अमृतवाणीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे.” प्रियदर्शी थेरोजी हे पाली आणि संस्कृत बौद्ध साहित्याचे अभ्यासक असून, त्यांनी अनेक देशांत बुध्द चरित्र कथांचे आयोजन केले आहे.
“जगाला युध्द नव्हे, बुध्द हवे,” या विचारातून या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. स्वामी विवेकानंदांच्या म्हणण्याप्रमाणे, करोडो वर्षांनी गौतम बुध्दासारखी महान व्यक्तीमत्वे जन्माला येतात. असे महामानवाचे चरित्र बुलडाणेकरांना ऐकण्याची संधी मिळणे ही आनंदाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे समन्वयक भाईजी यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विजय वाकोडे, दिलीपभाऊ, सुमित सरदार, शैलेश भंडारे, गजानन जाधव, प्रशांत इंगळे, निवृत्ती सरकटे, सिद्धार्थ शर्मा व प्रा. प्रकाशचंद्र पाठक आदी कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.
भाविकांनी या दिव्य सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राधेश्याम चांडक (भाईजी) यांनी केले आहे.