लोणार (सतिश मवाळ/हॅलो बुलढाणा) नवभारत फर्टीलायझर कंपनीच्या कीटकनाशक फवारणीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हरभरा पिक धोक्यात आले आहे.याकडे मात्र कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असून,वडगाव तेजन येथील शेतकरी संदीप तेजनकर यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान कृषी अधिकारी सदर कंपनीवर कारवाईची फवारणी कधी करणार? याकडे पीडित शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
शेतकरी राजाला शेतीमधून खर्च जास्त व उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकरी फार मोठ्या अडचणीत आलेले दिसून येत आहे.वार्षिक खर्चाचा विचार केला तर उत्पन्नाच्या तुलनेत शेतीमालाचा भाव फार कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय नकोसा वाटत आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी फार मोठे हिमतीने शेती व्यवसाय सुरू ठेवून संपूर्ण जगाला अन्नधान्याच्या रूपाने जगवत आहे.अशातच यावर्षी रब्बीची पेरणी झाल्यापासून हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणेच वातावरण पिकाला पोषक अवस्थेत दिसून येत नाही. व त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकावरील कीटकनाशक फवारणीचा जोर वाढत आहे. वडगाव तेजन येथील संदीप अंबादास तेजनकर या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातील हरभरा पिकावर वातावरणाचा व अळीचा अंदाज घेऊन कीटकनाशक फवारणीचा विचार करीत असताना नवभारत कंपनीचे गावातीलच असलेले एजंट गौतम मोरे यांचे कडून कीटकनाशक फवारणीसाठी औषधे घेतली.व 22 डिसेंबर 2024 रोजी हरभरा पिकावर त्या औषधीची फवारणी केली. परंतु दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याने शेतात जाऊन हरभरा पिकाची पाहणी केली असताना हरबरा पिक अत्यंत सुकलेल्या अवस्थेत दिसून आले.म्हणून संदीप तेजनकर या शेतकऱ्यांनी नवभारत फर्टीलायझर कंपनीचे एजंट गौतम मोरे यांच्यासोबत संपर्क केला व गौतम मोरे यांनी आपले वरिष्ठ गजभिये यांना फोनवरून सदर माहिती सांगितली. त्यानंतर नवभारत फर्टीलायझर कंपनीचे कर्मचारी गजभिये,गौतम मोरे व कृषी सहाय्यक राजीव शिरसाट तसेच कृषी अधीक्षक विष्णू भगवानराव शिरसाट यांनी संदीप तेजनकर यांच्या शेतामध्ये जाऊन हरभऱ्याची पाहणी केली. तेव्हा हा प्रकार आमच्या कंपनीच्या औषधीने झालेला नाही अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे नवभारत फर्टीलायझर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.परंतु घाबरलेल्या शेतकऱ्यांने संबंधित प्रकार हा लेखी स्वरूपामध्ये अर्ज करून तालुका कृषी अधिकारी लोणार यांना दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी कळविला.व त्याच अर्जाचे प्रतिलिपी माननीय कोकाटे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासह जिल्हाधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार लोणार,तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती लोणार या सर्वांना देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी व नवभारत फर्टीलायझर कंपनीचे कीटकनाशकाचा नमुना रासायनिक तपासणीसाठी पाठवावा अशी विनंती केली आहे.
परंतु यावर आता तालुका कृषी अधिकारी लोणार हे काय निर्णय घेतात याकडे वडगाव तेजन सह परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.दरम्यान रविराज शिदोरे,
तालुका कृषी अधिकारी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मी स्वतः पाहणी करून योग्य तो निर्णय घेणार आहे.
▪️देवेंद्र गझबे
नवभारत फर्टीलायझर अधिकारी म्हणतात..
‘शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या हरभऱ्यावर आम्ही अजून औषधी मारून हरभरा पूर्णपणे सुधारणा करून चांगल्या प्रकारे माल लागेल याचा प्रयत्न करणार व तसे न झाल्यास परिस्थिती पाहून कंपनीतर्फे भरपाई देणार.शेतकऱ्याला तक्रार न देण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला आहे परंतु शेतकऱ्यांनी तक्रार दिल्यामुळे कंपनीतर्फे वकील केस लढेल!’