बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पाश्चात्त्य पद्धतींच्या प्रभावाखाली वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींना विसर पडतोय, मात्र अंभोडा येथील गजानन वाघ यांनी समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे. वाघ यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत मतिमंद निवासी विद्यालय, म्हसला बु. येथील विद्यार्थ्यांसाठी स्वेटर व भोजन वाटप केले.
गजानन वाघ यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “स्वेटर घालताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकलेले हास्य हे माझ्यासाठी खऱ्या आनंदाचा क्षण होता. हा दिवस माझ्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने विशेष ठरला.”
या कार्यक्रमाला मतिमंद निवासी विद्यालयाचे अध्यक्ष शिवनारायण पोपळकर, माँ जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे यांसह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती. वाघ यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या संकल्पनेने समाजसेवेला नवा आयाम मिळाला आहे.
अशा विधायक कृतींमुळे वाढदिवस साजरा करण्याची नवी सामाजिक आणि आदर्श परंपरा प्रस्थापित होत आहे.