बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काही वर्षांपूर्वी रक्तदाना बाबत अनेक गैरसमज होते. त्यामुळे रक्तदान करायला कोणीही धजावत नव्हते. रक्तदानासाठी जनजागृती करावी लागत होती.मात्र, तरीही त्याला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. शासकीय आणि अशासकीय पेढ्यांमध्ये ठरावीक प्रमाणातच रक्तसाठा उपलब्ध असायचा.परंतु हे समीकरण बुलढाण्याच्या महामानव ग्रुपने बदलून टाकले. तब्बल 13 वर्षापासून सलग जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन रक्तदान चळवळ जिवंत ठेवणाऱ्या महामानव ग्रुपने उद्या 6 डिसेंबरला देखील रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन केले आहे.
शिव- फुले -शाहू- आंबेडकर विचारसारणीचे समतावादी रक्त अखंडितपणे प्रवाहित करण्याच्या पवित्र कार्यात प्रत्येकाचे योगदान लाभावे यासाठी 6 डिसेंबरचे औचित्य साधून,महामानव ग्रुप कडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतात. स्वतः रक्तदान करण्याबरोबरच ते इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित करतात. ज्यामुळे ब्लड बँकांना पुरेशा प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध होत आहे.हजारो रुग्णांसाठी ही चळवळ जीवनदायी ठरत असून हीच मानवतेची सेवा करण्याची संधी परत 6 डिसेंबरला आलेली आहे. त्यामुळे उद्या सकाळी 9 वाजता पासून सायंकाळी 7 पर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदानासाठी उपस्थित राहावे असे आवाहन, महामानव ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुमित गायकवाड यांनी केले आहे.