चिखली (हॅलो बुलडाणा) वैरागड गाव आणि संपूर्ण उदयनगर जिल्हा परिषद सर्कल ही माझी राजकीय जन्मभूमी आहे, या परिसरातून माझा राजकीय उदय झाला त्यामुळे तुम्हा सर्वांशी माझे एक विशेष भावनिक नाते आहे आणि या नात्याला जपण्यासाठी तुमच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. गेल्या पाच वर्षात जे जे काही करता येईल ते ते करण्याचा मी प्रयत्न केला असून या विकास वाटेवरील पुढचे पाऊल टाकण्यासाठी मला तुमची समर्थ साथ हवी आहे आणि ती तुमच्याकडून पूर्वीपेक्षाही अधिक भक्कमपणे मिळेल असा मला विश्वास असल्याचे भावनिक प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. दि. १२ नोव्हेंबर रोजी आपल्या जन आशीर्वाद दौऱ्यानिमित्त वैरागड येथे भेट दिली असता झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.
महायुतीच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्वेताताई महाले यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित जन आशीर्वाद दौऱ्यामध्ये १२ नोव्हेंबर रोजी उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमधील गावांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये तोरणवाडा, किन्ही सवडद, हरणी, वैरागड, डासाळा, टाकरखेड हेलगा शेलसुर, डोंगर शेवली आणि शेलोडी या गावांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी आ. श्वेताताई महाले यांचे जंगी स्वागत गावकऱ्यांनी केले. ठिकठिकाणी श्रीमती महाले यांना स्थानिक गावकरी, महिला, युवक यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैरागड येथे देखील जागोजागी महिलांनी औक्षण करून व पुष्पवृष्टी करून श्वेताताई महाले यांचे स्वागत केले.
मला पुन्हा एकदा आपल्या सेवेचे संधी द्या – श्वेताताई महाले
वैरागड येथे प्रचार फेरी दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला आ. श्वेताताई महाले यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये श्रीमती महाले यांनी मतदारांशी संवाद साधला. महायुती सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने चिखली मतदारसंघाच्या विकासाला गती प्राप्त झाली आणि त्याचा लाभ ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्यात मी यशस्वी झाले; यापुढे देखील राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी मला पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्या असे आवाहन श्वेताताई महाले यांनी यावेळी मतदारांना दिले.
भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय कोठारी, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सिंधुताई नखोद, पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र कलंत्री, माजी पंचायत समिती सदस्य संजय महाले, राधाबाई कापसे, तालुका अध्यक्ष सुनील पोफळे, शेतकरी संघटनेचे नेते समाधान कणखर, किशोर जामदार, बळीराम काळे, समाधान शेळके आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. प्रगतीशील कास्तकार एकनाथराव राजे जाधव यांनी या सभे प्रसंगी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भास्करराव आढळकर आणि गजानन मोरे यांनी आपल्या भाषणातून आ. श्वेताताई महाले यांच्या विकासकार्याचा उल्लेख करत पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने श्वेताताईंना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. सभेचे प्रास्ताविक वैरागडचे माजी सरपंच अमोल साठे यांनी केले तर सूत्रसंचालन बबनराव राऊत यांनी केले. वैरागड येथील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तथा समस्त गावकऱ्यांची सभेला मोठ्या संख्येने उपस्थित लाभली होती.