खामगाव (हॅलो बुलढाणा) शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर वरपक्षाकडून तब्बल 11 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी अमोल सरकटे, रा. खामगाव यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात कैफियत सादर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल सरकटे हे कृषी उत्पन्न बाजार समितीत मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची 19 वर्षीय मुलगी शिक्षण घेत असून तिच्या विवाहासाठी नातेवाईकांमार्फत स्थळ पाहण्याची प्रक्रिया सुरू होती. याच दरम्यान धांडे याचे स्थळ नातेवाईकांमार्फत आले. कपिल हा भारतीय सैन्यात सेवारत असल्याची माहिती देण्यात आली होती.
29 ऑक्टोबर 2025 रोजी वरपक्षातील नातेवाईक मुलगी पाहण्यासाठी खामगाव येथील सरकटे यांच्या घरी आले. मुलगी पसंत असल्याचे सांगून लगेच साखरपुड्याचा आग्रह करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबर 2025 रोजी खामगाव-शेगाव रोडवरील हॉटेल द्वारकाधीश येथे साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी हॉटेल भाडे, जेवण, फोटोशूट, कपडे, भेटवस्तू आदींवर सुमारे 7 ते 8 लाख रुपये खर्च झाल्याचे कैफियतीत नमूद आहे. मात्र साखरपुड्यानंतर वरपक्षाकडून 11 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करण्यात आली, तसेच मागणी पूर्ण न केल्यास मुलीचे शिक्षण आणि वय खोटे सांगितल्याचा आरोप करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे खामगावात खळबळ उडाली असून, हुंड्यासारख्या सामाजिक कुप्रथेविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. आता खामगाव शहर पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










