ज.जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील सुनगाव येथून काळजी वाढवणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. घरातील सर्वजण निद्राधीन असताना २५ वर्षीय विवाहिता दिपाली अर्जुन पाटील या पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून अचानक बाहेर पडल्या आणि त्यानंतर त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही. ही घटना १ जुलै २०२६ रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे.
दिपाली या कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर गेल्यानंतर बराच वेळ परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची धावपळ उडाली. नातेवाईकांनी परिसरात, ओळखीच्या ठिकाणी तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेतला; मात्र दिपाली यांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर पती अर्जुन किसन पाटील यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.
या प्रकरणी मिसिंग क्र. ६७/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून, ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रविकांत बावस्कर पुढील तपास करीत आहेत.
दिपाली पाटील या वय २५ वर्षे, रंग निमगोरा, उंची ५ फूट ५ इंच, बांधा मजबूत, केस लांब असून शेवटच्या वेळी साडी व ब्लाउज परिधान केलेले होते. वरील वर्णनाची महिला आढळल्यास त्वरित जळगाव जामोद पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










