spot_img
spot_img

वसतिगृहातून बाहेर गेला… पाण्यात उतरला… अन् परतलाच नाही! पिंपळगाव काळे आश्रमशाळेच्या निष्काळजीपणाने पाचवीच्या चिमुकल्याचा बळी?

ज.जामोद (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेतून काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अवघ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. निवासी आश्रमशाळेत राहणाऱ्या लहान मुलाच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? हा प्रश्न आता संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून थेट विचारला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा विद्यार्थी आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहत होता. काल दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास काही मुले आश्रमशाळेच्या परिसरालगत असलेल्या पाण्याच्या ठिकाणी गेल्याची माहिती आहे. खेळता खेळता हा विद्यार्थी खोल पाण्यात गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. मात्र, एवढी लहान मुले वसतिगृहातून बाहेर कशी गेली? त्यांच्यावर देखरेख ठेवणारे गृहपाल, वॉचमन आणि जबाबदार कर्मचारी त्या वेळी कुठे होते? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

घटनेनंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आश्रमशाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. धोकादायक पाण्याच्या साठ्याभोवती सुरक्षा व्यवस्था नव्हती, सूचना फलक नव्हता, तसेच मुलांच्या हालचालींवर योग्य निगराणी नव्हती, असा आरोप करण्यात येत आहे. मुलगा बेपत्ता असल्याचे वेळेत लक्षात आले असते, तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, अशी हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली. नातेवाईकांनी दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी केली. काही काळ मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार देण्यात आल्याचे समजते.

स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून, या प्रकरणी निष्काळजीपणाची चौकशी सुरू आहे. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, गृहपाल आणि संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!