साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा /दर्शन गवई) गावातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाली असून आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल १० ते १२ जणांना चावा घेतल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. १८ ऑक्टोबर रोजी तांबोळीपुऱ्यातील श्रीमती सईदाबी शेख इब्राहीम तांबोळी (वय ६०) ह्या सकाळी ६ वाजेच्या सुमारास नमाजपठन झाल्यानंतर गल्लीत वॉकिंग करतांना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक त्यांच्या पोटरीला चावा घेतला. अचानकपणे कुत्र्याने हल्ला केल्याने त्या भांबावल्या व त्याचे तावडीतून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी हाताने त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला परंतु कुत्र्याने त्यांच्या हाताचा लचकाच तोडला. दरम्यान कल्लोळ झाल्याने मोहल्ल्यातील लोकांनी त्यांची कशीबशी सुटका करुन त्यांना लगेच बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आले.
या पिसाळलेल्या कुत्र्याने नंतर तांबोळीपुऱ्यातीलच शे. अलफेस (वय १४), शे. रय्यान शे. रियाज (वय ६), रेश्मा परवीन शे. इलयास (वय २०), शे. आवेस शे. रियाज (वय १६), अल्वीरा शे. वसीम (वय ६), तसेच म्हसाजी किसन पाझडे (वय ७५), शरद सुभाष गायकी (वय ३५), कृष्णा रामेश्वर डोईजड (वय १०), सुमन लक्ष्मण शिराळे (वय ४५) अशा एकूण १० जणांना चावा घेतल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमार सुरुशे यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेर्डा यांनी सुद्धा तत्पर सेवा दिली .पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निलेशभाऊ पोंधे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी केली आहे.