बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचा आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा एक भाग म्हणून, बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने आज शहरात कर्मचाऱ्यांच्या सहभागाने एका उत्साही आणि प्रेरणादायी ‘तिरंगा बाईक रॅली’ने राष्ट्रभक्तीचा जागर केला. ‘हातात तिरंगा आणि मनात राष्ट्राभिमान’ घेऊन पोलीस बांधवांनी स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या तिरंगामय करून देशप्रेमाचा महाजल्लोष केला.
14 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत
ही तिरंगा बाईक रॅली येथील पोलीस कवायत मैदानातून सुरू झाली.पालकमंत्री मकरंद पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. ही रॅली कारंजा चौक, एडेट चौक, त्रिशरण चौक, सर्क्युलर रोड मार्गे धाड नाका,संगम चौक, जयस्तंभ चौक,स्टेट बँक चौक,कोर्ट चौक, कारंजा चौक मार्गे परत पोलीस कवायत मैदानात या रॅलीचा यशस्वी समारोप करण्यात आला.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पोलीस दलाच्या या रॅलीत राष्ट्रभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला. या रॅलीमुळे देशभक्ती, राष्ट्रीय ऐक्य आणि अभिमानाची प्रबळ भावना प्रतिबिंबित झाली. जिल्हा पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने या रॅलीत उत्साहाने सहभागी झाले. अभिमानाने राष्ट्रध्वज हातात घेऊन, सहभागींनी देशभक्तीच्या घोषणा देत आणि एकता, सलोखा व राष्ट्रनिष्ठेचा संदेश पसरवत निर्धारित मार्गावरून संचलन केले.
हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण जनसंपर्क उपक्रम म्हणूनही उपयुक्त ठरला, ज्याने ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या भावनेला दृढ केले आणि नागरिकांना राष्ट्राप्रती अभिमान व जबाबदारीच्या नव्या भावनेने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास प्रोत्साहित केले.
▪️पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले…
देशासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. देशातील लोकशाहीची अधिक चांगल्या पद्धतीने वाटचाल व्हावी, ऐक्याची भावना निर्माण व्हावी, आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चैतन्यपूर्ण वातावरण निर्मिती व्हावी हा तिरंगा रॅली मागचा उद्देश असल्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यावेळी म्हणाले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले,आमदार मनोज कायंदे, ॲड.काझी,ओम सिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.













Total Users : 3295076